पुणे

हडपसर विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे

पुणे – हडपसर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून ५३२ मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज संपन्न झाली असल्याची माहिती मा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी दिली.
हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृह येथे पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेवेळी निवडणूक पर्यवेक्षक श्री. भीम सिंग, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे, मा.जिल्हा समन्वय अधिकारी – श्री.महेश सुधळकर, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – श्री.नागनाथ भोसले, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी – श्री. अमोल पवार, मा.नायब तहसीलदार श्रीमती जाई कोंडे तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन विभागाचे मा.नोडल अधिकारी श्री. आव्हाड यांच्यासह संबधित कक्षाचे समन्वय अधिकारी आणि उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी, मा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वप्नील मोरे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. तद्नंतर सरमिसळ प्रक्रियेला सुरुवात झाली. निवडणूक पर्यवेक्षक श्री. भीम सिंग यांनी देखील उपस्थित उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.
हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी १२७६ बॅलेट युनिट, ६३८ कंट्रोल युनिट आणि ६९१ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. त्यांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून आज करण्यात आली. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ५३२ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ५३२ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी २ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून २१२ बॅलेट युनिट, १०६ कंट्रोल युनिट आणि १५९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.

यापूर्वी दि. १९ ऑक्टोबर २०२४, २१ ऑक्टोबर २०२४ व २२ ऑक्टोबर २०२४ या दिवशी पहिली सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) पार पडली होती. दि. ०६ नोव्हेंबर २०२४ रोजी पुरवणी (Supplimentary) सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) पार पडली होती.
त्याचप्रमाणे आज दि.०८ नोव्हेंबर २०२४ रोजी द्वितीय सरमिसळ प्रक्रिया (रँडमायझेशन) झाल्यानंतर, मतदान यंत्रांचे Pairing दि. ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. दि. १० नोव्हेंबर २०२४ ते दि. १२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये Symbol Loading करण्यात येणार आहे. व दि. १३ नोव्हेंबर २०२४ ते दि. १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ईव्हीएम Commissioning करण्यात येणार आहे.