मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील जबरी चोरीचा पर्दाफाश! रेकॉर्डवरील आरोपी लोणावळ्यात अटक
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनचालकांना लुटणाऱ्या टोळीतील एका रेकॉर्डवरील आरोपीला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
15 जुलै रोजी पहाटे औंढे गावाजवळ एका टेम्पो चालकाला लघुशंकेसाठी थांबले असताना चार जणांनी चाकूचा धाक दाखवत सुमारे 25 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता.
या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संदेश अंकुश हिलम या 23 वर्षीय आरोपीला लोणावळ्यातून अटक केली.
आरोपीकडून व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि 9 हजार 700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही समोर आले असून, त्याच्यावर यापूर्वी दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





