स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पुणे शहरातर्फे भावपूर्ण अभिवादन
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना भवन, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, पुणे येथे शिवसेना पुणे शहराच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच पुणे शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, निर्णयक्षम नेतृत्व, प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासकामांप्रती असलेल्या कटिबद्धतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र ठसा उमटवला. जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने निर्णय घेण्याची त्यांची कार्यशैली आणि सर्वसामान्यांशी असलेली जवळीक यामुळे ते लोकनेते म्हणून सर्वांच्या मनात कायम राहतील.”
ते पुढे म्हणाले की, “स्वर्गीय अजितदादा पवार आणि शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात राजकारणाच्या पलीकडे जाणारे जिव्हाळ्याचे, दिलदार आणि परस्पर सन्मानाचे मैत्रीपूर्ण नाते होते. पक्ष वेगळे असले तरी एकमेकांविषयीचा आदर, आत्मीयता आणि विकासाच्या मुद्द्यांवर असलेली सकारात्मक भूमिका त्यांनी कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंवाद आणि परस्पर सन्मानाचे हे नाते नेहमीच आदर्श मानले जाईल. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही.”
यावेळी विधान परिषदेच्या आमदार डॉ.नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, “स्वर्गीय अजितदादा पवार हे विकासाला प्राधान्य देणारे, प्रशासनातील बारकावे जाणणारे आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्य करणारे नेतृत्व होते. त्यांचे कार्य आणि लोकाभिमुख दृष्टिकोन पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहतील. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.” त्यानंतर त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.
या अभिवादन कार्यक्रमास पुणे शहरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सुधीर कुरुमकर,संदीप शिंदे,महेंद्र जोशी,अंजली दिघे,विश्वास दिघे,निलेश जगताप, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच पुणे शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





