पालखीला गेले, चोरांनी घर फोडले! बार्शीत ₹96,500 चा ऐवज लंपास
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात घरफोडीची घटना समोर आली आहे. पालखी सोहळ्यासाठी घर बंद करून गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत जवळपास ₹96,500 किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
बार्शीतील सोलापूर रोडवरील बालाजी कॉलनी येथे राहणारे गजानन भुजंगराव कुलकर्णी हे पत्नीसह संत मुक्ताई मातेच्या पालखी सोहळ्यासाठी आणि शेतीच्या कामानिमित्त शेंद्री येथे गेले होते.
याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअरचे लॉक आणि खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि ₹26 हजारांची रोकड असा एकूण ₹96,500 किमतीचा ऐवज चोरून नेला.
२१ जुलै रोजी घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार शबाना कोतवाल पुढील तपास करत आहेत.





