विशाल चव्हाण खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर जेरबंद!

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील गाजलेल्या विशाल चव्हाण खून प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणातील फरार आरोपी स्वप्निल काळे, रा. बेनकर वस्ती, धायरी याला गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर आणि राजू वेगरे यांना आरोपी पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
हे प्रकरण १३ जानेवारी रोजी घडले होते. विशाल चव्हाण आणि त्याचे मित्र किरकटवाडीत पार्टी करत असताना रात्री सुमारे ११ वाजता किरकोळ वाद झाला. त्यावेळी निरंजन धावडे याने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.
गोळी विशाल चव्हाणच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या खूनप्रकरणातील फरार आरोपीला अटक झाल्याने तपासाला आता अधिक गती मिळणार असून, पुढील तपास नांदेड सिटी पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.