50 कोटींचा Crypto Scam? TLC 2.0 गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक; सासवड पोलिसांचे आवाहन!
आर्थिक फसवणुकीचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 361/2026 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम प्रकाश जगताप, संतोष पोपट कटके आणि संकेत इनामके यांनी Trillioner कंपनीच्या TLC 2.0 या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. गुंतवलेल्या रकमेवर 40 टक्के TLC 2.0 कॉईन, तसेच रक्कम दुप्पट आणि दरमहा 4 ते 7 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. सध्या 21 लाख फसवणूक ची तक्रार सासवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या आमिषाला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या बँक खात्यांद्वारे ऑनलाइन पैसे जमा केले. मात्र, ठरल्याप्रमाणे मासिक परतावा किंवा मूळ रक्कम न मिळाल्याने सासवड, पुणे, शिरवळ, सातारा आणि इतर भागातील अनेक गुंतवणूकदारांची अंदाजे 50 ते 52 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र ठेविदार हितसंरक्षण अधिनियम, Banning of Unregulated Deposit Schemes Act, 2019 आणि Prize Chits and Money Circulation Schemes (Banning) Act, 1978 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सासवड पोलिसांनी आवाहन केले आहे की, या आरोपींकडून ज्यांची आर्थिक फसवणूक झाली असेल, त्यांनी तात्काळ सासवड पोलीस ठाण्यात संपर्क साधून तक्रार नोंदवावी. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.





