गोरक्षकांनी गोपालक बनावे; गोपूजनाच्या नादी न लागता गोसेवा करावी” – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
पुणे येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे मा. न्यायाधीश श्री.अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीप्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या खाजगी फौजदारी तक्रारीवरील सुनावणी सुरू आहे. फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सदर खटला दाखल केला असून, राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार हे फिर्यादीचा उलटतपास घेत आहेत.
आजच्या उलटतपासणी दरम्यान बचाव पक्षाने विनायक दामोदर सावरकर लिखित ‘विज्ञाननिष्ठ निबंध’ या पुस्तकातील विविध उतारे फिर्यादी सात्यकी सावरकर यांच्यासमोर ठेवले. सदर पुस्तक व त्यातील मजकूर विनायक दामोदर सावरकर यांनीच लिहिलेला असल्याचे फिर्यादीने मान्य केले.
उलटतपासणीत यज्ञ, होमहवन आणि धार्मिक कर्मकांडांबाबत सावरकरांनी मांडलेले विज्ञाननिष्ठ विचारही समोर आले. यज्ञामुळे यश प्राप्त होते ही समजूत चुकीची असून, यज्ञामुळे श्रम व द्रव्याचा अपव्यय होतो तसेच आधुनिक काळात होम-हवन करणे हा अडाणीपणा व खुळचटपणा असल्याचे सावरकरांनी लिहिल्याचे फिर्यादीने प्रश्नोत्तरादरम्यान मान्य केले.
तसेच, यज्ञ किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्याऐवजी अनाथालये व दवाखाने उभारणे अधिक उपयुक्त आहे, असा आशय सावरकरांच्या लिखाणात असल्याचेही फिर्यादीने मान्य केले.
गाय देवता नसून पशू सावरकरांचे लिखाण उलटतपासणीत
गाईविषयी सावरकरांचे विचारही आजच्या उलटतपासणीत समोर आले. गाय ही देवता नसून एक पशू आहे; गाढव, कुत्रा आणि घोडा यांसारखे इतर पशूदेखील मानवी जीवनासाठी महत्त्वाचे व उपयुक्त आहेत, असा विचार सावरकरांनी मांडल्याचे फिर्यादीने मान्य केले.
गायीला देवत्व देण्याच्या प्रथेबाबत प्रश्न उपस्थित करताना सावरकरांनी गाढवाचे पूजन करण्याचा सांप्रदाय काढला तर? किंवा घोडा उपयुक्त पशू आहे म्हणून ‘घोडदेव’ कल्पना करायची का?, अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केल्याचेही उलटतपासणीत समोर आले.
गायीला नैवेद्य अर्पण करण्याऐवजी शिळे व खरकटे पदार्थ हेच तिचे भोजन असते, असा उल्लेख सावरकरांच्या लिखाणात असल्याचेही फिर्यादीने मान्य केले.
गोमूत्र प्राशन व गोशेणाबाबतही सावरकरांची टीका, सावरकरांनी गोमूत्र प्राशन करणे अथवा गायीचे शेण खाणे हा निव्वळ मूर्खपणा आहे, असा स्पष्ट विचार मांडल्याचेही फिर्यादीने मान्य केले.
त्याच धर्तीवर घोड्याचे मूत्र, गाढवीचे दूध किंवा कोंबडीची विष्ठा यांना औषधी मानण्याच्या अंधश्रद्धेवर सावरकरांनी प्रश्न उपस्थित केला असल्याचे उलटतपासणीत स्पष्ट झाले. अशा प्रकारच्या अंधश्रद्धा व धर्मभोळेपणा सोडून गोपूजनाऐवजी गोसेवा करण्याचा सल्ला सावरकरांनी दिला होता, असा आशय असलेल्या प्रश्नांना फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी होकारार्थी उत्तरे दिली.
उलटतपासणी पुढे सुरू राहणार
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्याने आजची उलटतपासणी तहकूब करण्यात आली असून, पुढील सुनावणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.
या प्रकरणात बचाव पक्षास अॅड. ज्ञानेश्वरी जाधव, अॅड. रेणुका बाठे आणि अॅड. सायली कांबळे सहकार्य करीत आहेत. फिर्यादी सात्यकी सावरकर यांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर काम पाहत आहेत.





