सावरकर बदनामी प्रकरणात उलटतपासणीसाठी ‘टाईमटेबल’ देण्याची फिर्यादीची मागणी
पुणे येथील मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा विशेष एमपी-एमएलए न्यायालयाचे मा. न्यायाधीश श्री. अमोल श्रीराम शिंदे यांच्या न्यायालयासमोर सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कथित बदनामीकारक वक्तव्याच्या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर विरुद्ध लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी या फौजदारी बदनामी खटल्यात फिर्यादीच्या वतीने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३०९ अंतर्गत अर्ज दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांची सरतपासणी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पूर्ण झाली असून, त्याच दिवशी आरोपी राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी फिर्यादीची उलटतपासणी सुरू केली. सदर उलटतपासणी मागील सुमारे सात महिन्यांपासून सुरू असून, त्यामुळे आपल्याला गंभीर त्रास व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे फिर्यादीने आपल्या अर्जात नमूद केले आहे.
फिर्यादीने न्यायालयाकडे केलेल्या प्रमुख मागणीनुसार, आरोपीच्या वतीने सुरू असलेली उर्वरित उलटतपासणी पूर्ण करण्यासाठी आणखी किती दिवस किंवा किती महिन्यांचा कालावधी लागणार आहे, याबाबत आरोपीच्या वकिलांना स्पष्ट व निश्चित ‘टाईमटेबल’ अथवा वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.
सदर वेळापत्रक निश्चित झाल्यास आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करता येईल तसेच न्यायालयीन कार्यवाहीमुळे आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनावर होणारा परिणाम आणि मानसिक त्रास कमी करता येईल, असा दावा फिर्यादीने अर्जात केला आहे.
दरम्यान, सदर अर्जावर आरोपी राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांचे म्हणणे न्यायालयाने मागविले आहे. या अर्जावर दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सुनावणी होणार आहे.
सदर प्रकरणातील उलटतपासणी ही फौजदारी खटल्यातील महत्त्वाची न्यायालयीन प्रक्रिया असून, फिर्यादीच्या अर्जावर आरोपीच्या वतीने काय भूमिका मांडली जाते आणि न्यायालय त्यावर काय निर्णय घेते, याकडे कायदेवर्तुळाचे लक्ष लागले आहे.





