ड्युटीवर रील बनवली अन् थेट निलंबनाची कारवाई!
ड्युटीवर रील बनवण्याचा मोह एसटी कर्मचाऱ्यांना चांगलाच महागात पडला . पनवेल एसटी आगारातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल एसटी आगारातील एका महिला वाहकासह तीन कर्मचारी ड्युटीच्या वेळेत, एसटीच्या गणवेशात आणि महामंडळाच्या परिसरात तसेच बसमध्ये रील्स तयार करत होते.
या रील्समध्ये “नको मागे मागे माझ्या फिरू… माझं दुसरीकडं हाय सुरू” या गाण्याचा वापर करण्यात आला होता. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला.
महामंडळाच्या शिस्तीचे आणि सोशल मीडिया वापरासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घटनेनंतर सरकारी आणि सार्वजनिक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर कसा आणि कितपत करावा, याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.





