आरोपींची धिंड आता नाही! पुणे पोलिसांचे कडक आदेश.

Rokhthok Maharashtra 31 0

पुणे पोलिसांकडून मोठा निर्णय! आरोपींची धिंड काढणे आणि सार्वजनिक अपमान करण्यावर आता स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात अल्पवयीन आरोपींची कथित धिंड काढल्याचा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाणे, शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर निर्देश जारी केले आहेत.
राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. यानंतर जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात कोणत्याही आरोपीची धिंड काढू नये किंवा त्याचा सार्वजनिक अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय आरोपीला उठाबशा काढायला लावणे, वाहनावर उभे करून फिरवणे, दोरी किंवा साखळीने बांधणे अथवा अपमानास्पद वागणूक देण्यासही मनाई करण्यात आली आहे.
अटक ते न्यायालयात हजर करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया BNSS, महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या डी. के. बसू प्रकरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच पार पाडावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगासह आवश्यक कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.