हडपसरमध्ये संताप! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; नागरिक आक्रमक, युवती ताब्यात

Rokhthok Maharashtra 8 0

पुण्यातील हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा संतापजनक प्रकार समोर आला आहे! ससाणेनगर परिसरात एका युवतीने पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं.
हडपसरमधील ससाणेनगर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका युवतीने चप्पल फेकल्याची घटना घडली.
हा प्रकार समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी संतप्त झालेल्या काही महिलांनी संबंधित युवतीला मारहाण केल्याची माहिती आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून काळेपडळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युवतीला ताब्यात घेतलं.
या प्रकरणी पोलिसांनी संबंधित युवतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनास्थळी मोठी गर्दी जमल्यामुळे काही काळ वातावरण अत्यंत संतप्त झालं होतं. मात्र, गिरीशा निंबाळकर यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी पुढाकार घेतल्याने आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी कायदा हातात न घेता कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हडपसरमधील या घटनेची पुढील चौकशी आता काळेपडळ पोलीस करत आहेत.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.