मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघात! ८ मजुरांचा चिरडून मृत्यू; २५ जण गंभीर जखमी

Rokhthok Maharashtra 13 0

राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; ८ मजुरांचा मृत्यू, २५ जण गंभीर जखमी!
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७९ वर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. मजुरांनी भरलेल्या लोडिंग वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की लोडिंग वाहन महामार्गावरच उलटले. या दुर्घटनेत तब्बल ८ मजुरांचा मृत्यू, तर सुमारे २५ ते २६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
हे सर्व मजूर उत्तर प्रदेशातील रहिवासी असून डबरा परिसरातील चनूर भागात भात रोपणीच्या कामासाठी आले होते. दिवसभराचे काम संपवून मध्यरात्रीच्या सुमारास ते लोडिंग वाहनातून परतत असताना चिन्का परिसरात हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, पाच जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाला. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी धडक देणारा ट्रक ताब्यात घेतला असून चालकाचा शोध सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.