लोकसहभागातून उभी राहिली आदर्श नगर पोलीस चौकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे यांचा कौतुकास्पद उपक्रम

Rokhthok Maharashtra 6 0

फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे तसेच परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेता, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत पोलीस मदत पोहोचवताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे यांनी आदर्श नगर परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याचा विचार मांडला.या संदर्भात शासकीय स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असतानाच परिसरातील नागरिक व विविध संस्थांशी संवाद साधताना लोकसहभागातून ही पोलीस चौकी उभारता येईल का, असा विचार पुढे आला. या संकल्पनेला नागरिक, संस्था आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाले आणि अखेर या अभिनव संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

लोकसहभागातून आदर्श नगर येथे कंटेनरमध्ये सुसज्ज पोलीस चौकी सुरू करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना पोलिसांची मदत अधिक जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. मोठ्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या भागात स्थानिक पातळीवर पोलीस उपस्थिती निर्माण करण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.या उपक्रमासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह ‘व्हॉइस ऑफ हांडेवाडी’ या नागरिकांच्या संस्थेनेही पुढाकार घेत हातभार लावला. नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून साकारलेला हा उपक्रम लोकसहभागातून सार्वजनिक सुविधांची निर्मिती कशी करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ठरला आहे. 

दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी ‘व्हॉइस ऑफ हांडेवाडी’च्या सर्व सदस्यांनी आदर्श नगर पोलीस चौकीला भेट देत या उपक्रमाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भूषण पोटवडे आणि पोलीस उपनिरीक्षक श्री. रोहित जाधव यांचे या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल अभिनंदन करण्यात आले.लोकांच्या सहभागातून, लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांना अधिक जलद पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद, परस्पर सहकार्य आणि लोकसहभाग यांचा सकारात्मक संगम साधला तर परिसराच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी आणि शाश्वत उपक्रम उभे राहू शकतात, याचे आदर्श नगर पोलीस चौकी हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.