पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा कथित काळा धंदा? मृत्यूची भीती दाखवून 45 हजारांची फसवणूक!
पुण्यात ‘मोनाली आई विधाते’चा कथित काळा धंदा उघड? मृत्यूची भीती दाखवून 45 हजारांची फसवणूक!
पुण्यात पूजा, जादूटोणा आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे.
‘मोनाली आई विधाते’ हिच्यासह पाच जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोनाली विधाते, कृष्णा विधाते, तिचा भाऊ मयुर, अशोक बनकर आणि मंजु कौर अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील 47 वर्षीय व्यक्तीने पोलिसांत तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत शारीरिक व्याधी आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचं आमिष दाखवण्यात आलं.
फेसबुकवरील ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ या अकाउंटच्या माध्यमातून देवी-देवतांशी संबंधित व्हिडीओ शेअर करून लोकांना आकर्षित केलं जात असल्याचा आरोप आहे.
हळदी-कुंकू, दोरा, बाहुली आणि कथित जादूटोण्याच्या साहित्याच्या नावाखाली पैसे घेतले. एवढंच नाही तर तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखवत उतारा करण्याच्या नावाखाली 21 हजार रुपये रोख आणि 21 हजार रुपये ऑनलाइन, तसेच इतर शुल्क मिळून तब्बल 45 हजार 400 रुपये घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे.
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी बिबवेवाडी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत.
आता या प्रकरणात नेमकं सत्य काय? आणखी किती लोकांची अशाच पद्धतीने फसवणूक झाली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.





