कोकणला टोलमाफी, मराठवाड्याला का नाही? गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या मराठवाडावासीयांना विशेष टोलसवलतीची मागणी

Rokhthok Maharashtra 9 0

पुणे : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी मिळते; मग गौरी-गणपतीसाठी मराठवाड्यातील आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना टोलमाफी का मिळू नये, असा सवाल मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळेपाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुणे-मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाडावासीयांचे आपल्या मूळ गावाशी असलेले नाते आजही तितकेच घट्ट आहे. गौरी-गणपती हा त्यांच्यासाठी केवळ सण नसून कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणारा आणि शहरातून गावाकडे परतण्याची परंपरा जपणारा सांस्कृतिक सोहळा आहे.
कोकणातील गणेशभक्तांसाठी शासनाने यंदा विशेष टोलमाफीची व्यवस्था केली आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर मराठवाड्यातील नागरिकांसाठीही विशेष सवलत देण्याची मागणी आता पुढे आली आहे.

“मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य सांस्कृतिक प्रदेश आहे. पुणे-मुंबईत स्थायिक झालेला मराठवाडावासी वर्षभर कुटुंबापासून दूर राहतो. गौरी-गणपतीच्या निमित्ताने तो आपल्या गावात परततो. शासनाने या भावनेचा विचार करावा. टोलमाफी ही केवळ आर्थिक सवलत नसून गावाशी जोडलेल्या भावनिक नात्याचा सन्मान आहे,” असे टेळेपाटील यांनी म्हटले आहे.

या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देण्यात येणार असून, मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवरील संबंधित पथकर नाक्यांवर गौरी-गणपतीच्या कालावधीत टोलमाफी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भौगोलिक अंतराने प्रदेश वेगळे असले तरी गौरी-गणपतीचा उत्सव महाराष्ट्राला भावनिक आणि सांस्कृतिक धाग्याने जोडतो. या सांस्कृतिक सेतूला शासनाच्या टोलसवलतीची जोड मिळणार का, याकडे आता मराठवाडावासीयांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.