जुन्या पैशांच्या वादातून तरुणावर गोळी झाडली
पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाधववाडी परिसरातील ओलियो हॉटेलजवळ जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रवी धनाजी घोगरे, वय 35, हे 14 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास ओलियो हॉटेलजवळ आले होते. त्यावेळी स्वप्नील कांताराम जाधव आणि त्याचा चालक रोशन पिंगळे तिथे उपस्थित होते.
पूर्ववैमनस्य आणि जुन्या आर्थिक व्यवहारावरून रवी घोगरे आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर स्वप्नील जाधवने ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ अशी धमकी देत पिस्तुलातून रवी घोगरे यांच्या दिशेने गोळीबार केला. यात रवी घोगरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर चिखली पोलिसांनी अवघ्या काही तासांत स्वप्नील जाधव आणि रोशन पिंगळे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पिस्तूल, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे करत आहेत.





