गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणावर ‘वॉच’!
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ध्वनी प्रदूषणावर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. पुणे शहरातील तब्बल २०० ठिकाणी दररोज सहा तास ध्वनी पातळीचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे निरीक्षण केले जाणार आहे.
याशिवाय पुण्यातील १५ प्रमुख वाहतूक चौकांवर २४ तास ध्वनी पातळीचे निरीक्षण करण्यात येणार आहे. हे निरीक्षण १५, १९, २० आणि २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार आहे.
राज्यातील २७ शहरांमध्ये १३२ निरीक्षण केंद्रांवर विशेष ध्वनी निरीक्षण मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी, त्यातील बदल आणि विविध भागांतील ध्वनी पातळीचे शास्त्रीय पद्धतीने संकलन व विश्लेषण केले जाणार आहे.
याबाबतची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी दिली आहे.





