पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश

Rokhthok Maharashtra 9 0

पुणे, दि. १५ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये १६ सप्टेंबर रोजी ००.०१ वाजेपासून २९ सप्टेंबर रोजी २४.०० वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी हा आदेश जारी केला आहे.

या कालावधीत विविध सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी तसेच २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्या वतीने मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे, बंद आदी आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश देण्यात आला आहे.

शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ बाळगण्यास बंदी
मनाई आदेशाच्या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्याची हत्यारे, काचेचे तुकडे किंवा रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे अथवा तयार करणे यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाले, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा वस्तू सोबत बाळगण्यासही प्रतिबंध आहे.

पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढणे यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह घोषणा, सभ्यता व नीतिमत्तेला धोका निर्माण करणारी भाषणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

शासकीय सेवेतील व्यक्ती तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना हा आदेश लागू राहणार नाही.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद आहे

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.