गणेशोत्सव कालावधीत दुकानांमध्ये माल लोड-अनलोड करण्यासाठी रात्री २ ते सकाळी ११ पर्यंत परवानगी
पुणे, दि. १५ : गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरातील मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानांमध्ये मालाची ने-आण तसेच लोडिंग-अनलोडिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हलक्या मालवाहू वाहनांमधून दुकानांमध्ये माल लोड-अनलोड करण्यास पहाटे २ ते सकाळी ११ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींच्या आधारे हे आदेश जारी केले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी तसेच धावणाऱ्या वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्यवर्ती भागातील प्रमुख बाजारपेठांचा समावेश
या आदेशानुसार भोरे आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड तसेच मध्यवर्ती भागातील दुकानांमध्ये वरील कालावधीत हलक्या मालवाहू वाहनांद्वारे मालाची लोडिंग-अनलोडिंग करता येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी व्यापारी व दुकानदारांनी निर्धारित वेळेचे पालन करून पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





