मोहोळांच्या ताफ्याला ओव्हरटेक; ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा!

Rokhthok Maharashtra 10 0

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं एका ३२ वर्षीय दुचाकीस्वाराला चांगलंच भोवलं आहे. पुण्यातील संचेती चौकात ताफ्यातील वाहनाला कट मारल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम विजय वनित, वय ३२, असं संबंधित दुचाकीस्वाराचं नाव आहे. १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुरलीधर मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून जात होता. त्यावेळी शुभमने भरधाव आणि वेडीवाकडी पद्धतीने दुचाकी चालवत ताफ्यातील वाहनाला कट मारल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मोहोळ यांचे अंगरक्षक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर भिकुले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी शुभम वनित याला नोटीस बजावली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मुरलीधर मोहोळ हे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विद्युत रोषणाईच्या उद्घाटनासाठी आले होते. गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. याच गर्दीत मंत्र्यांचा ताफा आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि गर्दीच्या ठिकाणी ताफा आणण्याची गरज होती का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.