सोनाली गवारे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे न्यायालय परिसरात महत्त्वाच्या साक्षीदारावर पाळत ठेवल्याच्या आरोपाप्रकरणी आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेल्या महिलेचे नाव सोनाली दीपक गवारे असे आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी हा आदेश दिला.
तक्रारीनुसार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजीनगर येथील पुणे न्यायालयाच्या आवारात हा प्रकार घडला.
आरोपी सोनाली गवारे यांचे वडील नानासाहेब गायकवाड यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल असून, तक्रारदार हे त्या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत.
सुनावणीसाठी साक्षीदार सरकारी अंगरक्षक आणि वकिलासह न्यायालयात आले होते. यावेळी एका व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा संशय अंगरक्षकाला आला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर सोनाली गवारे यांनी कथितरित्या गोंधळ, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने आरोपीची घटनास्थळावरील उपस्थिती आणि पोलिसांच्या जबाबांचा विचार करत प्रथमदर्शनी सहभाग दिसून येत असल्याचे नमूद करत अटकपूर्व जामीन फेटाळला.





