वसई-विरारमध्ये मोकाट गुरांवर लगाम!

Rokhthok Maharashtra 6 0

मोकाट गुरांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि अपघातांच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत बुधवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. वसई-विरार शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर महापालिका आता कडक पावलं उचलणार आहे.
नगरसेविका प्रमिला पाटील यांनी महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर कोंढवाडे उभारून मोकाट गुरांना तिथे ठेवण्याची मागणी केली. तर नगरसेविका प्रज्ञा पाटील यांनी गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्राणीप्रेमी संस्थांना गुरचरणासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या संस्थांकडून गुरांची देखभाल होऊ शकते, असं मत व्यक्त केलं.
दरम्यान, सहायक आयुक्त करुणा जुईकर यांनी सांगितलं की, 30 सप्टेंबरपर्यंत प्रभागनिहाय पशुपालकांची यादी तयार केली जाणार आहे. पशुपालकांना सूचना देऊनही गुरे रस्त्यावर आढळल्यास ती गोशाळेत जमा केली जातील. गोशाळा चालकांना प्रति गाय 50 रुपये दिले जाणार असून, पशुपालकांकडून वसूल होणारा दंड गोशाळांना देण्यात येणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.