पुण्यातील ट्रॅफिकवर जितेंद्र नाराज; म्हणाले, “ट्रॅफिक कंट्रोलमध्येच नाही!”

Rokhthok Maharashtra 5 0

“बाहेरून इथे यायला दीड तास लागला, ट्रॅफिक कंट्रोलमध्येच नाही!”;पुण्यातील वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांची नाराजी
बाप्पाच्या चरणी काय मागितलं? यावर म्हणाले – “जितकं मिळेल तितकं कमीच, फक्त मनाची शांती हवी!”
पूणे :
गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते जितेंद्र यांनी पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर तीव्र उद्विग्नता व्यक्त केली आहे. बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शहरात बेफाट वाढलेल्या ट्रॅफिकवर बोट ठेवले, तसेच बाप्पाच्या चरणी कुटुंबाचे सुख आणि ‘मनाच्या शांती’साठी प्रार्थना केल्याचे सांगितले.

“ते नसते तर रात्री ११ वाजले असते…” : ट्रॅफिकचा सांगितला अनुभव
दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला येण्याचा अनुभव सांगताना जितेंद्र म्हणाले,
“दरवर्षी ट्रॅफिक वाढतच चाललं आहे. ट्रॅफिक अजिबात कंट्रोलमध्ये नाही. सगळे असे इकडनं-तिकडनं कसेही घुसतात आणि शेवटी सगळेच थांबतात! कोणालाच पुढे जायला मिळत नाही.”

पुढे आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, “बाहेरून इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला तब्बल दीड तास लागला. सुदैवाने येथील दोन-चार कार्यकर्त्यांनी सहकार्य करून वाट काढून दिली म्हणून मी आत्ता पोहोचू शकलो. ते नसते तर मला इथे पोहोचायला रात्रीचे ११ वाजले असते.”

बाप्पाच्या चरणी काय मागणं मागितलं?
पत्रकारांनी ‘बाप्पाकडे काय प्रार्थना केली?’ असा प्रश्न विचारला असता, जितेंद्र यांनी अत्यंत भावूक आणि मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले,
“फक्त मनाची शांती! माझी नातवंडे (ग्रँडचिल्ड्रन) आणि माझ्या मुलाबाळांच्या सुखासाठी मी प्रार्थना केली. माणसाला जितकं मिळतं तितकं कमीच असतं, पण मनाची शांती मिळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ‘पीस ऑफ माइंड’ पाहिजे, कारण बाकी सर्व गोष्टी येतात आणि जातात.”

‘हा तर फिल्मी इंटरव्ह्यू झाला!’ : जितेंद्र यांची मिश्किल टिप्पणी
संवादाच्या सुरुवातीला एका पत्रकाराने त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षणाबद्दल विचारले असता, जितेंद्र यांनी हसतमुखाने, “हा तर फिल्मी इंटरव्ह्यू झाला!” अशी मिश्किल टिप्पणी करत प्रश्नाला बगल दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.