विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत कौशल्याधारित शिक्षणाची गरज-वाबळे ‘रयतेची शाळा’ उपक्रमांतर्गत वडकी येथे विशेष गावभेटीचे आयोजन
फुरसुंगी : “जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे शाळेतच दडलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यामध्ये विविध कौशल्ये, सर्जनशीलता आणि ज्ञान विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध वाबळेवाडी शाळेचे ग्रामस्थ सतीश आण्णा वाबळे यांनी केले.
वडकी, वडकीनाला, गायकवाडवाडी व तळेवाडी परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वतीने ‘रयतेची आदर्श शाळा’ निर्मितीच्या उद्देशाने विशेष गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सतीश आण्णा वाबळे यांनी उपस्थित शिक्षक, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना शाळा विकास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या शितल कांबळे, पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी, मनोज चौधरी, सुषमा मुरकुटे, शुभांगी खिरिड, कुशल सातव, राणी वाळके, कोमल कांबळे, वडकीच्या सरपंच हंसा साबळे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
उपसभापती विद्या गायकवाड यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक गणामध्ये रोबोटिक्स लॅब उभारण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रयोगशील व कौशल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सतीश आण्णा वाबळे म्हणाले, “शाळा चांगली आहे की वाईट, हे केवळ इमारत किंवा सुविधांवरून ठरवता कामा नये; त्या शाळेतून घडणारे विद्यार्थीच तिची खरी गुणवत्ता ठरवतात. आज आर्थिक सुबत्ता वाढली आहे; मात्र त्याचबरोबर ज्ञानाची सुबत्ता निर्माण करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य, जिज्ञासा आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित झाली पाहिजे.”
गावभेटीच्या माध्यमातून शाळा, शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्यातील समन्वय वाढवून आदर्श शाळा उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत





