फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेची पर्यावरणपूरक तयारी; १२ ठिकाणी कृत्रिम तलाव, निर्माल्य संकलनाची स्वतंत्र व्यवस्था
फुरसुंगी : गणेश विसर्जनामुळे जलप्रदूषण होऊ नये, यासाठी फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेने यंदा पर्यावरणपूरक नियोजन केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरात १२ ठिकाणी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले असून, हार-फुले व अन्य निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सोनार पूल, पवार आळी, बेंदवाडी, महात्मा फुले वसाहत (गंगानगर), शिवशक्ती चौक, पीएमटी डेपो भेकराईनगर, भेकराई माता शाळा, कै. शिरीषभाऊ शेवाळे चौक, संकेत विहार याठिकाणी तर उरुळी देवाची गावामध्ये मारुती मंदिर, आदर्शनगर आणि समता विद्यालय येथे कृत्रिम तलावांची सुविधा करण्यात आली आहे.
नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी नदी, ओढे किंवा तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन न करता कृत्रिम तलावांचा वापर करावा, तसेच निर्माल्य पाण्यात न टाकता निर्माल्य कलशात जमा करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.
‘माझा बाप्पा, माझी जबाबदारी’—भक्ती जपूया, पर्यावरणही वाचवूया!
फोटो ओळ : पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जनासाठी नगरपरिषदेमार्फत सोय करण्यात आलेले विसर्जन हौद.
रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत





