नगर–सोलापूर रोडवर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
नगर–सोलापूर रोडवर घोगरगावजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी रात्री घोगरगाव गावाच्या बाहेरील भागात, मिरजगाव एम.के. हॉटेलसमोर हा अपघात झाला. भाऊसाहेब सुपेकर, रा. कुळधरण, सुपेकरवाडी हे हिरो होंडा दुचाकीवरून प्रवास करत होते.
रस्ता क्रॉस करत असताना MH-15-CT-4271 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नागरिकांच्या मदतीने दुचाकीची ओळख पटविण्यात आली आणि मृत व्यक्ती भाऊसाहेब सुपेकर असल्याचे समोर आले.
अपघातामुळे नगर–सोलापूर मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता आणि इतर परिस्थिती काय होती, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.
भाऊसाहेब सुपेकर यांच्या निधनाने कुळधरण आणि सुपेकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.





