दगडूशेठ गणपतीच्या गर्दीत दागिने चोरणारी टोळी गजाआड!

Rokhthok Maharashtra 7 0

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा पाहण्यासाठी आलेल्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे आरती आकाश चव्हाण, सुवर्णा रोहित शिंदे आणि रोहित उर्फ दीपक शिंदे अशी आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील स्टॉलसमोर मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत आरोपींनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लोखंडी कटरच्या साहाय्याने कापून चोरी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गस्तीदरम्यान पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि अजिम शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीमध्ये लोखंडी कटर आणि चोरीचे सोन्याचे दागिने आढळून आले.
आरोपींकडून २ लाख ५९ हजार १४० रुपये किमतीचे १८.५१० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे फरासखाना पोलीस ठाण्यातील २ आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील ३, असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे आणि पोलीस निरीक्षक महाले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.