५ हजारांच्या प्रोटीन पावडरसाठी जिम ट्रेनरची हत्या!
जालना शहरात अवघ्या ५ हजार रुपयांच्या प्रोटीन पावडरच्या व्यवहारावरून २६ वर्षीय जिम ट्रेनरची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जालना शहरात समोर आली आहे.
मृत तरुणाचे नाव राहुल राजपूत, वय २६ वर्षे असून तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. ही घटना गणपती विसर्जनाच्या दिवशी जालना शहरातील लोधी मोहल्ला परिसरात घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ हजार रुपयांच्या प्रोटीन पावडरच्या व्यवहारावरून राहुल राजपूत याचा काही जणांसोबत वाद झाला होता. याच वादातून राहुलवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.अवघ्या ५ हजार रुपयांच्या वादातून तरुणाचा जीव गेल्याने जालना शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या परिस्थितीत झाली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.





