‘दुष्ट शक्ती’ची भीती दाखवली, 1.60 लाख उकळले; 21 वर्षीय तरुणीचा मांत्रिकाच्या मुलाशी साखरपुडा!

Rokhthok Maharashtra 9 0

नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे येथील एका महिलेला अघोरी पूजा, उतारे आणि जादूटोण्याची भीती दाखवत तब्बल १ लाख ६० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात नाशिकमधील संशयित मांत्रिक महिला सरिता मनोज जाधव आणि तिच्या साथीदारांविरोधात धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितांना नाशिकमधून अटक केली आहे.
फिर्यादीनुसार, प्रकृती आणि आर्थिक अडचणींचा फायदा घेत सरिता जाधव हिने अघोरी पूजा करण्याची शक्ती असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. लिंबू उतरवणे, राखेचे पाणी पाजणे आणि स्मशानात पूजा करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप आहे.
मात्र, प्रकरण इथेच थांबले नाही. पीडित महिलेच्या २१ वर्षीय मुलीला कुटुंबापासून दूर ठेवून, स्वतःच्या मुलाशी तिचा साखरपुडा लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “चाळीस दिवस तिकडे जाऊ नका, तिथे दुष्ट शक्ती आहेत”, अशी भीती दाखवल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
फसवणूक लक्षात आल्यानंतर महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.