नगराध्यक्ष, नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
फुरसुंगी : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील निवडून आलेले नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी निवडणुकीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून कथितरीत्या चुकीची अथवा अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करून नगरपरिषदेवर नवीन प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी तक्रारदार नितीन ऊर्फ नितेश गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. आयोगाकडून प्राप्त ई-मेलच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. तक्रारीतील मुद्द्यांची सखोल चौकशी करून अभिप्रायासह अहवाल सात दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तक्रारीतील कागदपत्रांची होणार पडताळणी
तक्रारदाराने नगरपरिषदेतील निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचे सदस्यत्व तातडीने रद्द करावे तसेच नगरपरिषदेवर नवीन प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी केली आहे. तक्रारीसोबत संबंधित कागदपत्रे जोडण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्याचे पत्रात नमूद आहे. त्यामुळे पूर्वीच्या तक्रारी, त्यासोबत सादर केलेली कागदपत्रे आणि सध्याच्या तक्रारीतील आरोप यांची पडताळणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
थकबाकी, घरमालकीसह विविध आरोप
तक्रारदार नितीन गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, काही नगरसेवकांनी निवडणूक लढविताना थकबाकी असतानाही थकबाकी नसल्याचा दाखला सादर केल्याचा आरोप आहे. तसेच काहींनी स्वतःचे घर असतानाही घर नसल्याचे दाखविल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय एका व्यक्तीचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत असल्याचा तसेच काही व्यक्तींनी पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, हे सर्व आरोप अद्याप चौकशीत सिद्ध झालेले नाहीत. संबंधित कागदपत्रांची पडताळणी, नगरसेवकांचे म्हणणे आणि उपलब्ध प्रशासकीय नोंदी तपासल्यानंतरच या आरोपांमधील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
नगरसेवकांकडून खुलासा मागविला
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेने संबंधित नगरसेवकांकडून खुलासा मागविला आहे. संबंधितांचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
या चौकशीमुळे फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेतील निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या पात्रतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची प्रशासकीय पातळीवर तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर होणाऱ्या चौकशी अहवालाकडे नगरपरिषद परिसराचे लक्ष लागले आहे.
“खोटी कागदपत्रे जोडून फसवणूक”
“काही नगरसेवकांनी निवडणूक लढविताना थकबाकी असतानाही थकबाकी नसल्याचा दाखला जोडला आहे. काहींनी स्वतःचे घर असतानाही घर नसल्याचे दाखविले आहे. एका व्यक्तीचे नाव दोन विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयादीत आहे, तर काहींनी पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. नियम डावलून किंवा चुकीची कागदपत्रे सादर करून निवडणूक लढविली असल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे.”
— नितीन गायकवाड, तक्रारदार, फुरसुंगी
“खुलासा मागविला आहे”
“जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या पत्राची दखल घेऊन संबंधित नगरसेवकांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.”
— प्रसाद शिंगटे, मुख्याधिकारी, फुरसुंगी-उरुळी देवाची.
रोखठोक न्युज फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत





