वडिलांचा मृतदेह ४ वर्षे फ्रीझरमध्ये! अमेरिकेत नेण्याचा होता अजब प्लॅन!
मुंबईच्या मालाडमध्ये वडिलांचा मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीजरमध्ये जतन करून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय व्यक्तीचा २०२२ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला होता. मात्र, कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह मालाडमधील एका बंद पॉली क्लिनिकच्या फ्रीजरमध्ये ठेवला.
कुरार पोलिसांना सोमवारी रात्री गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी क्लिनिकवर छापा टाकला. त्यावेळी फ्रीजरमध्ये मृतदेह आढळून आला.
चौकशीत कुटुंबीयांनी सांगितले की, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी इंटरनेटवर मृतदेह दीर्घकाळ जतन करण्याच्या पद्धतींचा शोध घेतला. त्यानंतर अमेरिकेतील क्रायोनिक्स केंद्राशी संपर्क साधून मृतदेह अतिशय कमी तापमानात जतन करण्याची योजना आखण्यात आली होती.
कुटुंबीय अमेरिकेत मृतदेह नेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेबाबतही सल्ला घेत होते. मात्र, गेल्या चार वर्षांपासून मृतदेह क्लिनिकमध्येच ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबीय, क्लिनिक व्यवस्थापन आणि जागेच्या मालकाचे जबाब नोंदवले आहेत. मृतदेह अशा प्रकारे दीर्घकाळ जतन करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे, याबाबत पोलीस कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.





