भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; एक ठार!
लातूर जिल्ह्यात भरधाव कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
मुरूडहून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक GJ 05 JS 8514 ची बोरगाव काळे येथील पेट्रोल पंपाजवळ दुचाकी क्रमांक MH 14 GP 6926 ला समोरासमोर जोरदार धडक झाली. मंगळवारी रात्री सुमारे सात वाजता हा अपघात झाला.
या अपघातात महादेव भाऊसाहेब पांचाळ, वय २६, रा. रामेगाव यांचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तर शाम दयानंद पांचाळ, वय २० आणि शशिपाल शिवाजी काशीकर, वय १९ हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
शाम आणि शशिपाल हे पेट्रोल पंपावर रात्रीच्या ड्युटीसाठी जात होते. त्यांना सोडण्यासाठी महादेव पांचाळ दुचाकीवरून सोबत आला होता. पेट्रोल पंपापासून अवघ्या काही अंतरावर हा अपघात झाला.
जखमींना प्रथम मुरूड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
महादेव यांचे तीन-चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी मुरूड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





