१,२२४ गणेश मंडळांच्या आवाजाची तपासणी!
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या ध्वनिप्रदूषणावर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
२५ आणि २६ सप्टेंबर रोजी झालेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील १,२२४ गणेश मंडळांसमोरील ध्वनिक्षेपक आणि ढोल-ताशा पथकांच्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.
या सर्व रीडिंगचे सध्या पोलिसांकडून विश्लेषण सुरू आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित गणेश मंडळांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांनी ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी ‘चार बेस, चार टॉप’ हा फॉर्म्युला लागू केला होता. तसेच ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा’ साउंड सिस्टिमवर बंदी घालण्यात आली होती.
मात्र, विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक आणि ढोल-ताशांचा वापर झाल्याचे निदर्शनास आले.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी संबंधित परिमंडळांच्या पोलीस उपायुक्तांना कारवाईचे अधिकार दिले आहेत. रीडिंगचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, आवश्यकतेनुसार गुन्हेही दाखल होऊ शकतात.





