जामखेडच्या गरोदर नर्तकीचा खून; धुळ्यात मृतदेह जाळला! सर्व ६ आरोपी गजाआड

Rokhthok Maharashtra 12 0

जामखेडच्या कला केंद्रातील गरोदर नर्तकी पिंकी काटकर यांच्या हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील सर्व ६ आरोपी पोलिसांच्या गजाआड आहेत.
२२ सप्टेंबरला धुळे जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह जाळलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा तपास सुरू झाला. तपासात मयत महिला जामखेड येथील कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करत असल्याचे समोर आले.
पोलिसांच्या तपासानुसार, पिंकी काटकर यांना सहा जणांनी मारहाण केली. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी मृतदेह कारमधून धुळे जिल्ह्यात नेला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने यापूर्वी चार आरोपींना ताब्यात घेतले होते. तर फरार असलेले फारुख हजु शेख आणि रोहिणी जाधव कळंबमध्ये आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांनाही अटक केली.
गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची कार आरोपींनी नंबर प्लेट काढून बेवारस सोडली होती. ती कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईनंतर या हत्याकांडातील सर्व सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.