‘प्रोटेक्शन मनी’ उकळणारा ‘बडा कन्ना’ अटकेत! माथाडी युनियनच्या नावाखाली खंडणीचा आरोप
मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात माथाडी कामगार युनियनच्या नावाखाली ‘प्रोटेक्शन मनी’ आणि खंडणी उकळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
कुख्यात गुंड कन्नन चिन्नादुराई वन्नियार ऊर्फ ‘बडा कन्ना’ याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीविरोधात मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, तीन साथीदार अद्याप फरार आहेत.
नदिम शेख या व्यावसायिकावर १७ ऑगस्ट रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासातून या टोळीचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी यापूर्वी सात आरोपींना अटक करण्यात आली होती.
तपासात माथाडी युनियनच्या नावाचा गैरवापर करून कंपन्यांची वाहने अडवणे, कामगार पुरवण्याच्या नावाखाली पैसे उकळणे आणि ‘वाराई’ किंवा ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाने व्यावसायिकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे आणि हत्यारांचा वापर करून दहशत निर्माण केल्याचाही आरोप आहे.
‘बडा कन्ना’ अटकेत असला तरी त्याचे तीन साथीदार अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.





