ठाणे हादरलं! ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; 2 संशयित ताब्यात
ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मनोरमा नगर परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मास्क आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांनी पुर्णेकर यांच्यावर चार राऊंड फायरिंग केली. यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या. त्यानंतर धारदार शस्त्रानेही त्यांच्यावर वार करण्यात आले.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून हल्लेखोर स्कुटीवरून आल्याचे दिसत आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, गुन्हे शाखेची नऊ पथके आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली आहेत.
या प्रकरणात निखील यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एका व्यक्तीचा संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी काही व्यक्तींनी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. हत्येनंतर मनोरमा नगर परिसरात बंद पाळण्यात आला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.





