९० कोटींच्या निविदेवरून पुण्यात राजकीय खळबळ!
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एका आमदाराने महापालिका आयुक्तांना थेट “तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो” अशी धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे.
आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि सुमारे २ किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे. यासाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती. या निविदेत ८ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता.
मात्र, एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून आपल्या पसंतीच्या ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी आमदाराकडून प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. या राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
त्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी निविदा प्रक्रिया नियमानुसार पुढे नेण्याचे आणि ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय कागदपत्रांच्या आधारे घेण्याचे आदेश दिले.छाननीनंतर संबंधित ठेकेदार पात्र ठरला. विशेष म्हणजे, या ठेकेदाराने आमदारांच्या पसंतीच्या ठेकेदारापेक्षा ९ कोटी रुपये कमी खर्चाची निविदा सादर केल्याचे सांगण्यात येत आहे.यानंतर आमदाराने आयुक्तांना फोन करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, आयुक्त नवलकिशोर राम यांनी धमकीचा प्रकार घडल्याला दुजोरा दिला, मात्र संबंधित आमदाराचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.





