येरवड्यात जलतरण तलावात गोंधळ; क्लोरीनमुळे त्रास?
पुण्यातील येरवडा परिसरातील हाउसिंग बोर्ड येथील मोझे जलतरण तलावात क्लोरीनचे प्रमाण वाढल्याने सुमारे १० मुलांना त्रास झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.पोहण्यासाठी तलावात गेलेल्या मुलांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने शास्त्रीनगर चौकातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं.यापैकी पाच मुलांना उलट्यांचा त्रास झाल्याने डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. तर काही मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं.प्राथमिक माहितीनुसार, तलावातील पाण्यात क्लोरीनचे प्रमाण अधिक झाल्यामुळे मुलांना त्रास झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, क्लोरीनचे प्रमाण नेमकं कशामुळे वाढलं, याबाबत अधिक तपास केला जात आहे.या घटनेला परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत यांनी दुजोरा दिला आहे.दरम्यान, जलतरण तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि क्लोरीनचे प्रमाण याबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जात आहे.





