पाषाण रोडवर पाणीच पाणी! मनसेचा प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम!

Rokhthok Maharashtra 10 0

पुण्यातील पाषाण रोड परिसरात पिण्याचे पाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पंचवटी मुख्य प्रवेशद्वार चौकाजवळील पादचारी मार्गाखालून पाण्याची गळती होत असून, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था अर्थात IISER च्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
हे पाणी पुढे एनसीएल इनोव्हेशन पार्कच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहत जात आहे. रस्त्यावर शेवाळ साचल्याने दुचाकी घसरून अपघात होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच साचलेल्या पाण्यामुळे पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी चतुःश्रृंगी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले.
पाण्याची गळती ४८ तासांत बंद न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी सुहास निम्हण यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.आता पुणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या समस्येवर किती लवकर उपाययोजना करतो, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.