मस्तानी तलावाचा जलसाठा घटला; निसर्ग आणि वन्यजीवांपुढे नवे संकट! वडकीत उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता; नैसर्गिक झरे खंडित झाल्याची चर्चा

Rokhthok Maharashtra 4 0

वडकी : कमी झालेल्या पावसामुळे वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव यंदा निम्म्याच क्षमतेने भरला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तलावातील घटता जलसाठा शेती, भूजलपातळी आणि वन्यजीवांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, परिसरातील पर्यटनावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

वडकी परिसराची ऐतिहासिक ओळख असलेला मस्तानी तलाव हा स्थानिक शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. तलावात पुरेसा पाणीसाठा झाल्यास परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होते. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकलेला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.

तलावाच्या परिसरातील निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेलाही या परिस्थितीचा फटका बसू शकतो. तलावावर अवलंबून असणारे पक्षी, सरपटणारे प्राणी आणि इतर वन्यजीव यांच्यासाठी पाण्याची उपलब्धता महत्त्वाची असते. पाणीसाठा कमी झाल्यास या वन्यजीवांना अन्य ठिकाणी स्थलांतर करावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, परिसरातील घाट रुंदीकरणाच्या कामामुळे नैसर्गिक झरे आणि धबधब्यांच्या प्रवाहावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. या कामांचा नैसर्गिक जलस्रोतांवर नेमका काय परिणाम झाला आहे, याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मस्तानी तलावातील पाणीसाठा हा केवळ शेतीपुरता मर्यादित विषय नसून, तो परिसरातील भूजलसाठा, वन्यजीव आणि पर्यटनाशीही जोडलेला आहे. त्यामुळे तलावाचे जलस्रोत जतन करणे आणि पाणीसाठा वाढविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.अश्विनी गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या, वडकी :
“मस्तानी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होते. याचा खरीप आणि रब्बी हंगामातील शेतीला मोठा फायदा होतो. मात्र, यंदा तलावात कमी पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.”

 

मायमराठी वृत्तपत्र प्रतिनिधी : गणेश भागीवंत

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.