हडपसरमध्ये सन्मित्र सहकारी बँकेच्या नवव्या शाखेचे उद्घाटन! मुरलीधर मोहोळ यांचे सहकार क्षेत्राबाबत मोठे विधान

Rokhthok Maharashtra 8 0

राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक! – केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
सन्मित्र सहकारी बँकेच्या आरूनगर येथील नवव्या शाखेचे उद्घाटन
पुणे | रोखठोक महाराष्ट्र न्यूज
राज्यातील सहकार चळवळ ही देशाला मार्गदर्शन करणारी असून, सहकारी बँकांचा विस्तार, त्यांच्या अडचणींचे निराकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
हडपसर येथील सन्मित्र सहकारी बँकेच्या आरूनगर या नवव्या शाखेचे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे होते.
या कार्यक्रमाला बँकेचे मार्गदर्शक तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश टिळेकर, डॉ. नारायण कर्णे, बँकेचे चेअरमन गणेश फुलारे, व्हाईस चेअरमन ॲड. विजय राऊत, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत ससाणे, यशवंतराव साळुंखे, संजय शेवाळे, सुनील गायकवाड, रमेश काकडे, रेश्मा हिंगणे, दिलीप टकले, प्रशांतमामा तुपे, अभिजीत शिवरकर, विजय कोद्रे, डॉ. हेमंत गाढवे, योगेश गोंधळे, अमोल धर्मावत, विशाल हाके, सविता गिरमे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील दणाईत उपस्थित होते. तसेच तज्ज्ञ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, निमंत्रित सल्लागार आणि सभासदांचीही उपस्थिती होती.
मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, देशात सुमारे आठ लाख सहकारी संस्था आहेत. त्यापैकी सव्वा दोन लाखांहून अधिक संस्था महाराष्ट्रात, तर पुणे जिल्ह्यात सुमारे ४० हजार सहकारी संस्था कार्यरत आहेत. सहकारी बँकांच्या ऑनलाइन बँकिंगसह विविध अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. सहकारी बँकांना नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन आणि डोअरस्टेप बँकिंगसारख्या सुविधांद्वारे सक्षम करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सहकार क्षेत्रात विकेंद्रीकरणाला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. सध्या सहकाराचे केंद्रीकरण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी सहकार हा राज्याच्या विकासाचा आत्मा असल्याचे सांगत सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेच्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. तर माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी सहकारी साखर कारखान्यांना समान न्यायाच्या तत्त्वावर मदत मिळावी आणि बंद पडणाऱ्या कारखान्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे मत व्यक्त केले.
दरम्यान, सन्मित्र सहकारी बँकेच्या आरूनगर शाखेमुळे हडपसर परिसरातील नागरिकांना बँकिंग सेवा अधिक जवळ उपलब्ध होणार आहे. बँकेच्या सध्या ३२५ कोटी रुपयांच्या ठेवी, १९० कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि ५१४ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असल्याची माहिती चेअरमन गणेश फुलारे यांनी प्रास्ताविकात दिली. सहकारी बँकांच्या ऑनलाइन सेवांमधील जाचक अटी रद्द झाल्यास सहकार चळवळीला अधिक गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अभिजीत शिवरकर यांनी केले, तर उपाध्यक्ष ॲड. विजय राऊत यांनी आभार मानले.
सन्मित्र सहकारी बँकेच्या नव्या शाखेमुळे हडपसर परिसरातील नागरिकांना बँकिंग सेवा अधिक सुलभ होणार असून, सहकार चळवळीच्या विस्ताराला गती मिळणार आहे.

 

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.