पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ५.६४ लाखांच्या नोटा जप्त

Rokhthok Maharashtra 15 0

पुण्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे! या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ५ लाख ६४ हजार रुपये दर्शनी मूल्याच्या १ हजार १२८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर, संगणक आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
महात्मा फुले मंडई परिसरात एक संशयित बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १४ ऑक्टोबर रोजी शुक्रवार पेठेतील म्हसोबा मंदिरासमोर सलमान जैनद्दीन राजे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख २ हजार ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ८०५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
चौकशीदरम्यान आणखी तीन साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
या प्रकरणात सलमान राजे, शाफाज फिरोज अन्सारी, विशाल विलास गलांडे आणि अभिजीत रावसाहेब कांबळे या चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या पूर्वपरवानगीने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.