वारुंजी फाट्यावरील अनधिकृत स्टॉल हटवले! महामार्गावरील वाहतूक झाली सुरळीत
कराडमधील वारुंजी फाट्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या ब्रीजखालील अनधिकृत स्टॉल अखेर हटवण्यात आले असून, या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत झाली आहे.
ब्रीजखाली फळांचे आणि इतर साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर खरेदीसाठी येणारे नागरिक महामार्गावरच दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी करत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. तसेच अपघाताचा धोकाही वाढला होता.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने संबंधित स्टॉलधारकांना समज दिली. त्यानंतर स्टॉलधारकांनी स्वतःहून स्टॉल हटवले.
या कारवाईमुळे वारुंजी फाट्यावरील वाहतुकीचा अडथळा दूर झाला असून, महामार्गावर अनधिकृत स्टॉल किंवा वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.





