‘मम्मी खाऊ दे… पप्पा घरी न्या!’ रेबीजशी झुंज देणाऱ्या 8 वर्षांच्या रेवतीचा दुर्दैवी मृत्यू
‘मम्मी, खाऊ दे… पप्पा, मला घरी न्या…’ आई-वडिलांना पाहून एका चिमुकलीच्या या आर्त हाका काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत… पण दुर्दैवाने, तिच्या जन्मदात्यांना तिला जवळ घेणंही शक्य नव्हतं… आणि अखेर उपचारादरम्यान या आठ वर्षांच्या चिमुरडीने प्राण सोडले.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याच्या बोरिवडे गावातील रेवती संतोष चौगुले हिचा रेबीजच्या संशयित संसर्गामुळे मृत्यू झाला.
२० ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं वाटत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने रेवतीवर हल्ला केला होता. सुरुवातीला उपचारानंतर ती बरी झाल्याचं दिसत होतं. मात्र काही दिवसांनी तिला चक्कर येणे, पाण्याची भीती वाटणे यांसारखी गंभीर लक्षणं दिसू लागली.
तिला कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संसर्गाच्या धोक्यामुळे डॉक्टरांनी तिला विलगीकरण कक्षात ठेवलं. तिथूनच रेवती आई-वडिलांना पाहून खाऊ मागत होती, पाणी मागत होती आणि घरी घेऊन जाण्याची विनवणी करत होती.
लेकीच्या आर्त हाका ऐकूनही तिला जवळ घेता आलं नाही… आणि शनिवारी पहाटे रेवतीची जीवनाशी सुरू असलेली झुंज संपली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.





