हडपसरच्या चिंतामणीनगरमध्ये महापालिकेचा बुलडोझर! अतिक्रमणधारकांना आयुक्तांचा कडक इशारा
पुणे महापालिकेचा अतिक्रमणधारकांना दणका! हडपसरच्या चिंतामणीनगरमध्ये धडक कारवाई; पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल होणार!
पुणे शहरात अतिक्रमणांविरोधात महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध भागांत धडक कारवाई सुरू असून, हडपसरमधील चिंतामणीनगर परिसरातही मोठी कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील अनधिकृत शेड, पत्रे आणि जाहिरात फलक मोठ्या प्रमाणात हटवण्यात आले. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
विशेष म्हणजे, कारवाईनंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच दुकाने सील केली जातील, असा कडक इशारा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
मात्र, खरा प्रश्न असा आहे की, महापालिकेची ही कारवाई किती दिवस टिकणार?
आज अतिक्रमण हटवले, उद्या पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण झाले तर जबाबदार कोण?
महापालिका केवळ कारवाई करणार की या जागांवर कायमस्वरूपी अतिक्रमण होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजनाही करणार?
आता पुणेकरांचे लक्ष महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.





