९५ हजारांची लाच घेणारा हवालदार दीड महिन्यानंतर जेरबंद! वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही नाव चर्चेत!
दीड महिना पोलिसांना गुंगारा देणारा लाचखोर हवालदार अखेर एसीबीच्या जाळ्यात! ९५ हजारांची लाच स्वीकारून झाला होता फरार; आता वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही टेन्शन वाढणार?
पुणे जिल्ह्यातील शिरूरमधून लाचखोरीचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. शिरूर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराला अटक न करण्याच्या मोबदल्यात हवालदार सतीश नाथराव मुंढे याने स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने एक लाख रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीनंतर ९५ हजार रुपये स्वीकारताच ३० सप्टेंबर रोजी एसीबीच्या पथकाची चाहूल लागताच मुंढे लाचेची रक्कम आणि गुन्ह्याची कागदपत्रे घेऊन फरार झाला होता.
तब्बल दीड महिना तपास यंत्रणांना गुंगारा दिल्यानंतर पुणे एसीबीच्या पथकाने त्याला शिरूर नगरपरिषद परिसरातून अटक केली आहे. न्यायालयाने तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे.
विशेष म्हणजे, लाचेची मागणी करताना मुंढेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही उल्लेख केल्याने या प्रकरणात बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे लाचेची ९५ हजार रुपयांची रक्कम अद्याप हस्तगत झालेली नाही. आता या प्रकरणात आणखी कोणाचे चेहरे उघड होणार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





