हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व अमित घुले यांची नियुक्ती; काँग्रेस पक्षाने सोपवली महत्त्वाची जबाबदारी!

Rokhthok Maharashtra 4 0

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीअंतर्गत विविध ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी युवा नेतृत्व अमित कृष्णा घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने २३ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत नियुक्तीपत्र शहराध्य प्रशांत जगताप यांनी जारी केले आहे.
अमित घुले हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजवर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आंदोलने आणि पक्ष संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. हडपसर परिसरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासह पक्षाचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर हडपसर ब्लॉक अध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित हडपसर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमित घुले म्हणाले की, काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून जी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे, त्या जबाबदारीचे मी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पालन करणार आहे. काँग्रेस पक्षाचे विचार आणि ध्येयधोरणे घराघरांत पोहोचविण्यासाठी काम करणार असून, हडपसरमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुणे शहर पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीअंतर्गत इतर नियुक्त्यांमध्ये कोंढवा-कात्रज ब्लॉक अध्यक्षपदी हेमंत दत्तात्रेय बधे, येरवडा-वडगावशेरी ब्लॉक अध्यक्षपदी रमेश धोंडीबा पराड, धानोरी-विश्रांतवाडी ब्लॉक अध्यक्षपदी सागर शिवाजी खांदवे, भवानी ब्लॉक अध्यक्षपदी वैजनाथ उर्फ सुनील शरद भावकर, पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्षपदी अमोल दिलीप बाचल, कसबा ब्लॉक अध्यक्षपदी सुरेश काशिनाथ कांबळे आणि नेहरू स्टेडियम ब्लॉक अध्यक्षपदी गणेश शिवाजी भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ब्लॉक कार्याध्यक्षपदी हडपसरमधून अॅड. प्रसाद सुभाष कोद्रे, कोंढवा-कात्रजमधून पप्पू शिवाजी घोलप, येरवडा-वडगावशेरीमधून सुनील बाबुराव काळोखे आणि धानोरी-विश्रांतवाडीमधून विजय अर्जुन साबळे यांची निवड करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पुणे शहर पूर्व जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.