नायगाव पेठेत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची धूळ! शेतकरी-ग्रामस्थ हैराण, प्रशासनाचे दुर्लक्ष?
पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या नायगाव पेठ परिसरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
कंपनीच्या परिसरातून उडणारी धूळ थेट शेतजमिनी, घरे आणि वस्ती परिसरात पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतीवर धुळीचा परिणाम होत असून ग्रामस्थांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, लोकवस्ती आणि गावाच्या जवळच कंपनीचे कामकाज सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
वारंवार धुळीचा त्रास सहन करणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांचा सवाल आहे की, कंपनीच्या कामकाजावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष आहे का? धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्या जात आहेत का?
प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कंपनीची प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तपासावी आणि नागरिकांना होणारा त्रास तातडीने थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कंपनीचा विकास महत्त्वाचा की स्थानिक नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता? याकडे आता प्रशासन लक्ष देणार का?





