रॅगिंग ला कंटाळून विद्यार्थ्याने केली आत्महत्या खेड्यातला म्हणून हिनवल, विद्यार्थ्याने घेतले विष

Rokhthok Maharashtra 1 440

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
बीड (प्रतिनिधी)
आयुर्वेदिकवैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने रँगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी वारंवार खेडय़ातला म्हणून हिणवल्याने नैराश्य आलेल्या गणेश कैलास म्हेत्रे (वय २०) याने विष प्राशन केले. चोवीस तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश म्हेत्रे हा धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगीर (जि. लातूर) येथे बीएएमएसच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत होता. शेतकरी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गणेश मोठय़ा जिद्दीने अभ्यास करत होता. ग्रामीण भागातून आलेल्या गणेशला ‘तू खेडूत आहेस, तू काय डॉक्टर होणार,’ असे टोमणे सातत्याने मारले जात होते. खेडय़ातला म्हणून हिणवले जात असल्याने तो निराश व्हायचा. या संदर्भात त्याने आपल्या कुटुंबीयांनाही माहिती दिली होती. कुटुंबीयांनीही महाविद्यालय प्रशासन आणि संबंधित प्राध्यापकांकडे तोंडी तक्रार केली होती. यापुढे असा प्रकार होणार नाही असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, अन्य विद्यार्थ्यांकडून रँगिंगचे प्रकार सुरूच होते. दोन दिवसांपूर्वी तो नाळवंडी येथे आला होता. शुक्रवारी सकाळी त्याने शेतात जाऊन विष प्राशन केले. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचार सुरू असताना शनिवारी गणेश याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राधाकृष्ण म्हेत्रे यांनी जिल्हा रुग्णालय पोलीस ठाण्यात माहिती दिली असून त्याची नोंद करण्यात आली आहे.

0 0 votes
Article Rating
440 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.