पुणे

फुरसुंगी व उरुळी देवाची परिसरातील महिला व नागरिकांचा अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा विरोधात रस्तारोको व हंडामोर्चा, मोर्चामुळे सासवड रोड जाम…!

पुणे: प्रतिनिधी 

शासकीय अधिकारी, ठेकेदार यांच्या असंवेदनशील पणा मुळे फुरसुंगी व उरुळी देवाची याठिकाणी होणारा संयुक्त पाणी पुरवठा योजनेत होणारी दिरंगाई व पुणे मनपा मार्फत होणाऱ्या अशुध्द व अनियमीत पाणी पुरवठ्याच्या विरोधात भेकराईनगर फुरसुंगी मधील नागरिकांनी हांडा मोर्चा तसेच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरिकांनी भेकराईनगर चौकातील पोलीस चौकी समोर, हांडा मोर्चा काडून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध केला तसेंच अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे घरातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे व सतत होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झालेले असल्यामुळे आज हा हंडामोर्चा काढण्यात आल्याचे स्थानिक महिला व नागरिकांनी सांगितले.

अशुद्ध पाण्यामुळे लहान मुले व वयस्कर माणसे मोठ्या प्रमाणात आजारी पडत असून सध्या अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असल्याने बरीच लहान मुले दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत याला संपूर्णपणे जबाबदार स्थानिक प्रशासन असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे,त्यामुळे आमच्या मुलांचा दवाखान्याचा खर्च प्रशासन करणार का असा प्रश्न स्थानिक आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे.

येणाऱ्या काळात नियमित व शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास पुढील काळात यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ,यावेळी भेकराईनगर परिसरातील तसेच पुणे-सासवड रोड,भेकराईनगर फुरसुंगी ढमाळवाडी, रुपीनगर, पापडेवस्ती, सुयबा परिसर, गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी येथील महिला व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.